Dhokla
साहित्य:
१ कप बेसन पिठ
१ कप पातळ ताक
२ लहान चमचे साखर
१/२ चमचा मिरची पेस्ट
१/२ चमचा आले पेस्ट
१ लहान चमचा हळद
२ लहान चमचे इनो
१ चमचा लिंबाचा रस
१ चमचा तेल
चवीपुरते मिठ
फोडणीसाठी: १ चमचा तेल, १/२ चमचा मोहोरी, २ हिरव्या मिरच्या बारीक चिरून, १/२ लहान चमचा हिंग
१ चमचा लिंबाचा रस
१ लहान चमचा साखर
२ चमचे पाणी
कृती:
१) १ कप बेसन पिठ, २ लहान चमचे साखर, १/२ चमचा मिरची पेस्ट, १/२ चमचा आले पेस्ट, १ लहान चमचा हळद, १ चमचा लिंबाचा रस, १ चमचा तेल, चवीपुरते मिठ हे सर्व साहित्य एकत्र करावे. त्यात १ ते सव्वा कप ताक घालावे.
२) वरील मिश्रण तयार झाले कि मिश्रणाचे दोन वेगवेगळे भाग करावे व वेगवेगळ्या भांड्यत ठेवावे.
३) एक मध्यम खोलीचा पसरट फ्राईंग पॅन घ्यावा. त्यात अर्ध्यापेक्षा किंचीत कमी भरेल एवढे पाणी उकळत ठेवावे. त्या पॅनमध्ये राहिल एवढ्या उंचीचे मेटलचे भांडे घ्यावे त्याला तेलाचा हात लावून घ्यावा. फ्राईंग पॅनच्या झाकणाला स्वच्छ पंचा बांधून घ्यावा म्हणजे वाफेचे पाणी ढोकळ्यात न पडता पंच्यात शोषले जाईल.
४) एक भाग मिश्रणात १ टिस्पून इनो घालून पटापट एकाच दिशेने अंदाजे १५-२० सेकंद ढवळावे. मिश्रण थोडे फसफसायला लागते. लगेच मिश्रण तेल लावलेल्या भांड्यात ओतून पाणी उकळत ठेवलेल्या पॅनमध्ये ठेवावे वरून पंचा लावलेले झाकण ठेवावे. मध्यम आचेवर १५ ते १८ मिनीटे वाफ काढावी. वाफ काढताना झाकण अजिबात उचलू नये. यासाठी अंदाज घेऊन आवश्यक तेवढे पाणी ठेवावे. पाणी कमी पडले आणि सर्व पाणी संपले तर ढोकळा भांड्याच्या तळाला चिकटून करपू शकतो.
५) जोवर ढोकळा तयार होतोय तोवर फोडणी तयार करू घ्यावी. लहानश्या कढल्यात किंवा लोखंडी पळीत १-२ चमचे तेल गरम करावे. त्यात मोहोरी, २ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, १/२ लहान चमचा हिंग घालून फोडणी तयार करावी. फोडणी किंचीत कोमट होवू द्यावी. एका वाटीत २ चमचे पाणी, १ चमचा लिंबाचा रस, १ लहान चमचा साखर यांचे मिश्रण तयार करावे. हे मिश्रण फोडणीत घालावे.
६) १५ मिनीटांनी गॅस बंद करावा. १-२ मिनीटांनी भांडे बाहेर काढावे. ढोकळा जरा गार झाला कि सुरीने कापून घ्यावा. त्यावर तयार केलेली फोडणी चमच्याने पसरावी.
ढोकळयाच्या मिश्रणाचा उरलेला भागही वरील प्रमाणेच वाफवून घ्यावा.
हा ढोकळा हिरव्या तिखट चटणी बरोबर झकासच लागतो.
टीप:
१) हा ढोकळा कूकरमध्येसुद्धा करू शकतो. फक्त कूकरच्या झाकणाला पंचा बांधून घ्यावा व ते झाकण नुसतेच वर ठेवावे, कूकर बंद करू नये. किंवा कूकरच्या झाकणापेक्षा जाडसर थाळीला पंचा बांधून ती कूकरवर झाकणासारखी ठेवावी.
Comments
Post a Comment